राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांनाही मोठा दिलासा मिळू शकतो. इतकंच नाहीतर राज्यावरील पाणी संकटही दूर होऊ शकतं. अशात कुठल्या जिल्ह्यांना इशारा देण्यात आला आहे? वाचा सविस्तर…

राज्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जात असताना बळीराजासाठी मात्र एक आनंदाची बातमी आहे. राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांनाही मोठा दिलासा मिळू शकतो. इतकंच नाहीतर राज्यावरील पाणी संकटही दूर होऊ शकतं. पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसाचे वारे वाहतील.

यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर-मध्य महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. परिणामी यामुळे राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, वर्धा, नागपूर, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. यावेळी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दुसरीकडे, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, मुंबई, ठाणे, कोकणात मंगळवारी चांगला पाऊस होईल. खरंतर, गेल्या ३-४ दिवसांपासून राज्यातल्या अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. पण असं असलं तरी अद्यापही राज्याच्या अनेक भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.