कल्याण: शिवसेनेचा मोठा संख्येने मतदार असलेल्या कल्याण, डोंबिवली शहरांमधून कल्याण लोकसभेचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी राज्य महामंडळाच्या ५८० मोफत बस गणेशोत्सवानिमित्त कोकणात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या बस डोंबिवली, कल्याण शहरांमधील प्रशस्त मैदाने, उड्डाण पुलांजवळ आणून उभ्या करण्यात आल्या आहेत.
शनिवारी संध्याकाळ पासून या बस कोकणातील गणेशभक्तांना घेऊन कोकणात धावण्यास सुरुवात करतील, असे खासदार कार्यालयातून सांगण्यात आले. मागील दोन ते तीन वर्षापासून हा उपक्रम शिवसेनेतर्फे खा. डाॅ. शिंदे यांच्या माध्यमातून राबविण्यात येतो.
डोंबिवली, कल्याण शहरांमध्ये कोकणातील रहिवासी नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने अधिक संख्येने राहतो. या मधील बहुतांशी मतदार हा शिवसेना, भाजपचा मतदार आहे. त्यामुळे या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपचे डोंबिवलीचे आमदार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खा. डाॅ. शिंदे यांच्याकडून वर्षभरात अनेक उपक्रम या मंडळींसाठी आयोजित केले जातात. गणेशोत्सव काळात मोफत बस सोडणे हाही त्या उपक्रमाचा एक भाग आहे.
डोंबिवलीतून २७५ बस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावागावांमध्ये सोडण्यात येणार आहेत. यामधील १४४ बस डोंबिवली पश्चिमेतील ठाकुर्ली पुलाजवळील रेल्वे मैदानावरुन सोडण्यात येणार आहेत. या बस शनिवारी संध्याकाळी साडे चार वाजता नियोजित गाव आणि तेथील प्रवाशांना घेऊन कोकणात निघतील. १३१ बस डोंबिवलीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुलातून सुटतील. या बस साडे पाच वाजता सुटतील. कल्याण पूर्व येथील १०० फुटी रस्त्यावरुन संध्याकाळी साडे सहा वाजता, कोळसेवाडी भागातील ड प्रभाग कार्यालयासमोरुन संध्याकाळी सात वाजता बस सुटतील. या बसना खा. डाॅ. शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला की या बसचे मार्गक्रमण सुरू होणार आहे.