खलिस्तानवादी चळवळीचा म्होरक्या हरदीपसिंग निज्जर याच्या कॅनडात झालेल्या हत्येशी भारताचा थेट संबंध जोडून कॅनडाने भारताबरोबरचे संबंध आता कमालीचे बिघडवून टाकले आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्यांच्या संसदेत भारतावर या हत्येला जबाबदार असल्याचे आरोप केले. एवढ्यावरच न थांबता कॅनडाने भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्याला परत पाठविण्याचा निर्णयही घेतला.
भारताने कॅनडाचे हे आरोप तातडीने फेटाळून लावले. शिवाय प्रत्युत्तर म्हणून कॅनडाच्याही एका राजनैतिक अधिकाऱ्यास पाच दिवसांत देश सोडून जाण्यास सांगितले आहे. भारताची डोकेदुखी असलेल्या खलिस्तानवादी अतिरेक्यांना कॅनडा कायमच आश्रय देत आलेला आहे. त्यामुळे भारताचे त्या देशाशी संबंध नेहमीच काहीसे तणावाचेच राहिले आहेत. आताच्या आततायी कृतीने त्या देशाने भारतासोबतचे संबंध पार बिघडवून टाकले आहेत. याचा परिणाम म्हणून भारत-कॅनडा यांच्यात होऊ घातलेला मुक्त व्यापार करारही भारताकडून स्थगित करण्यात आला आहे.